[ad_1]
मुंबई – अर्थमंत्री अजित पवार यांनी आज २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला असून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्याचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला असून याला राज्याचा अर्थसंकल्प म्हणायचे की काही विशिष्ट भागाचा म्हणायचे असा प्रश्न निर्माण झाल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पातून निराशा झाल्याचे म्हणाले आहेत.
याला राज्याचा अर्थसंकल्प म्हणायचा की विशिष्ट भागाचा अर्थसंकल्प हा प्रश्न आहे. या अर्थसंकल्पाने पूर्णपणे निराशा केली आहे. या अर्थसंकल्पातून प्रामाणिक शेतकऱ्यांना काहीही मिळालेले नाही. मूळ कर्जमाफीच्या योजनेत ४५ टक्के शेतकरी वंचित राहिले असून त्यांना एका नव्या पैशाची मदत झालेली नाही. शेतकऱ्यांना धान्यासाठी, विज बिलासाठी कुठल्याही प्रकारे सवलत दिलेली नाही. तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याज ही फसवी बाब आहे. महाराष्ट्रात ८० टक्के शेतकऱ्यांची कर्ज घेण्याची मर्यादाच ५० हजार असल्यामुळे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
पायाभूत सुविधा एकतर सुरू असलेले प्रकल्प आहेत किंवा केंद्र सरकारच्या योजना आहेत. रस्ते, सिंचन, रेल्वे, कुठलेही क्षेत्र घ्या.. कुठल्याही योजना केंद्र सरकारच्या योजना आहेत. त्यांनी जाहीर केल्या ठीक आहे, पण हे सांगायला सरकार विसरले, अशी टीका यावेळी त्यांनी केली.
महाराष्ट्राच्या बजेटमध्ये ज्या मुंबई महापालिकेच्या योजना आहेत त्याच घोषित केल्या आहेत आणि त्या सुरू असलेल्या योजना आहेत. काही योजना तर आमच्या सरकारच्या काळात सुरू झालेले प्रकल्प आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधांचा एकही प्रकल्प राज्य सरकारने केलेला नाही. प्राचीन मंदिरांच्या संदर्भातील घोषणा या सुरू असलेल्या व आधीच्या सरकारने केलेल्या कामांच्याच योजना आहेत. नवीन काही नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
रोज पेट्रोल-डिझेलचे बोर्ड घेऊन येणारे सत्तापक्षाचे आमदार यांच्या नाकावर टिच्चून राज्य सरकारने २७ रुपयांपैकी एक नवा पैसाही पेट्रोल-डिझेलवर कमी केलेला नाही. त्यामुळे आता राज्य सरकारला पेट्रोल-डिझेलच्या भावावर बोलण्याचा अधिकार नाही. कारण गुजरातपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल १० रुपये महाग आहे, कारण राज्य सरकारचा कर जास्त असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
[ad_2]
Source link