दुसरी कसोटी : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर गुंडाळला

[ad_1]


नवी दिल्ली – पहिल्या कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्वासक खेळी केली असून जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्याच्या जोरावर १९५ धावांवर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव गुंडाळण्यात भारताला यश आले.

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने घेतला. तिसऱ्याच षटकात जसप्रीत बुमराहने कांगारुंना धक्का देत सलामीवीर जो बर्न्सला माघारी धाडल्यानंतर मॅथ्यू वेड आणि लाबुशेन यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पण कर्णधार रहाणेने कांगारुंवर वर्चस्व मिळवण्यासाठी गोलंदाजीत बदल करत लगेच अश्विनला संधी दिली. आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत अश्विनने मॅथ्यू वेडला आपल्या जाळ्यात अडकवले. ३० धावा काढून वेड बाद झाला. त्यापाठोपाठ अश्विनच्या गोलंदाजीवर भोपळा न फोडता स्टिव्ह स्मिथही माघारी परतला. पहिल्या सत्राअखेरीस ऑस्ट्रेलियाचा संघ ३ बाद ६५ पर्यंत पोहचू शकला.

लाबुशेन आणि ट्रॅविस हेड जोडीने दुसऱ्या सत्रात चांगली सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत चौथ्या विकेटसाठी ८६ धावांची भागादीरी केली. मैदानावर ही जोडी जम बसवत असल्याचे वाटत असतानाच पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेने बुमराहला संधी दिली, आपल्या लौकिकाला साजेसा मारा करत बुमराहने ट्रॅविस हेडला रहाणेकरवी झेलबाद केले. ३८ धावा करुन हेड माघारी परतला. यानंतर पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या मोहम्मद सिराजनेही मैदानावर स्थिरावलेल्या लाबुशेनला माघारी धाडले. लाबुशेनचा सुरेख झेल शुबमन गिलने घेतला. ४८ धावांची खेळी लाबुशेनने केली.

चहापानापर्यंत ५ बाद १३६ अशी अवस्था असलेल्या ऑस्ट्रेलियाची अखेरच्या सत्रात पडझड झाली. तळातील फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला द्विशतकी टप्पा ओलांडून देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. भारताकडून बुमराहने ४, आश्विनने ३, सिराजने २ तर जाडेजाने १ बळी घेतला. ऑस्ट्रेलियाकडून लाबुशेनने ४८ तर ट्रॅविस हेडने ३८ धावा करत एकाकी झुंज दिली.

[ad_2]

Source link

Share

You may also like...

%d bloggers like this: