[ad_1]
नवी दिल्ली: नव्या कृषी कायद्यांच्या संदर्भात विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली असून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले आंदोलन हा विरोधकांचा डाव आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या कायद्यांच्या समर्थनार्थ आपली संपूर्ण राजकीय शक्ती पणाला लावणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ‘ऑनलाईन’ बैठकीत ते बोलत होते. यावेळी मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
कृषी कायद्यांच्या बाबत विरोधक दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप करून पंतप्रधान म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्या कायद्यांबाबत चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र, ही चर्चा मुद्द्यांवर आधारित, तर्कनिष्ठ आणि वस्तुस्थितीला धरून असली पाहिजे.
शेतकऱ्यांबद्दल कळवळा असल्याचा आव आणणारे प. बंगालमधील शेतकऱ्यांच्या नुकसानाबद्दल का बोलत नाहीत? मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्या राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान अनमान योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले आहे. विरोधक या कायद्यांमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात येण्याच्या अफवा पसरवीत आहेत. प्रत्यक्षात केरळमध्ये अशा बाजार समित्यांच अस्तित्वात नाहीत. इथे प्रसिद्धीसाठी आंदोलनांचा ‘इव्हेन्ट’ करणारे केरळमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन व्हाव्या म्हणून आंदोलने का करीत नाहीत; असे सवाल मोदी यांनी केले.
शेतकऱ्यांनी आपली दिशाभूल होऊ देऊ नये. त्यांनी तर्कनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ विचार करावा, असे आवाहन करतानाच मोदी यांनी आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी सादर केलेल्या अनेक योजनांची यादीच वाचून दाखवली.
[ad_2]
Source link