लोक कल्याणकारी लोकमाता: आहिल्यामाई
************
विनोद पंजाबराव सदावर्ते
मोबा: ९१३०९७९३००
************
अहिल्यामाई होळकरांचे नाव जरी घेतले तरी शत्रुला झोप येत नव्हती. एक महिला असुन मनुस्मृती नाकारून राज्यकारभार पाहते ही गोष्ट व्यवस्थेला कदापी पचणारी नव्हती म्हणून अहिल्यामाई होळकर यांनी राज्यकारभार हाती घेतला की धर्माच्या ठेकेदाराची जळफळाट झाली. अहिल्यामाई होळकर म्हणजे स्वाभिमानी, निर्भिड व विज्ञानवादी नेतृत्व. अहिल्यामाई ने सर्व अंद्धश्रद्धा व अनिष्ठ रुढीवर प्रहार करून समाजाला विज्ञानवादी बनवण्यासाठी त्यांचे कार्य होते. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात चोंडी या गावी जन्मलेल्या आईल्यामाई होळकारांनी ग्वाल्हेर पर्यंत राज्य केले. कुशल प्रशासक म्हणून अहिल्यामाईची छाप पेशव्यांच्या पोटात कळ निर्माण करणारी होती. प्रशासन कसे असावे, राजकीय निती कशी असावी, लोककल्यानाच्या योजना कशा असाव्या हे सर्व अहिल्यामाईचा राज्यकारभार बघितल्या नंतर कळते. जिभेला तलवारीची धार होती थोडक्यात शत्रुबद्दल व अनिष्ट रुढी परंपरा बद्दल टोकाची भुमिका व भाषा अहिल्यामाई होळकरांची असे. भारतामध्ये अनेक राजे होऊन गेले परंतु बोटावर मोजण्या इतकेच राजे आम्हाला माहिती आहेत याचे कारण ते राजे जरी असले तरी लोककल्याणकारी होते. लोकांचे हीत व लोकांचे परिवर्तन यामध्ये च या लोककल्याणकारी राजांना सुख समाधान मिळत असे. अहिल्यामाईचाच विचार करायचा तर मल्हार राव होळकर यांना फक्त अहिल्या एकच सुन नव्हती वा खंडेराव होळकर यांना अहिल्या एकच बायको नव्हती तरी राज्यकारभार अहिल्यामाईनेच का बघितला? कारण मनुस्मृती लाथाडून समतावादी व्यवस्था निर्माण करण्याची धमक अहिल्यामाईमध्येच होती. अहिल्यामाई जन्माने जरी स्रि होत्या तरी मनाने त्या नेहमीच धिट व खंबीर होत्या निर्णय क्षमता होती आणि शत्रुशी लढा देताना नेमकी कोणती रणनीती वापरायची याची जाणीव होती. खंडेरावांचा मृत्यू झाला होळकर घराण्यावर दु:ख कोसळले नवरा मेल्यानंतर नवऱ्याच्या चितेवर सती जाणे अन्यायकारी व्यवस्थेचा आदेश होता तरी मल्हारराव होळकर अर्थात अहिल्यामाई यांचे सासरे यांनी अहिल्यामाई यांना सती जाऊ दिले नाही उलट चितेवर अबला होऊन मेल्यापेक्षा सक्षम होऊन जनतेसाठी लढून मर अशा प्रकारचा सल्ला मल्हारराव होळकर यांनी दिला. खंडेराव गेले तेव्हा अहिल्यामाईचे वय होते फक्त एकोनतिस वर्षे. धर्माच्या विरोधात जाऊन मल्हारराव होळकर अहिल्यामाई यांना सती जाऊ देत नाहीत म्हणजे मल्हाररावांना धर्मातील अनिष्ट रुढी परंपरा व अंधश्रद्धा मान्य नव्हत्या. मग मल्हारराव होळकर यांना धर्माची बंधने मान्य नव्हती तर अहिल्यामाई होळकर ह्या धार्मिक कशा? ,अहिल्यामाई होळकर यांच्या हाती पिंड देऊन अहिल्यामाई होळकर यांचे चित्र आपल्या समोर उभे केले परंतु अहिल्या फक्त हातात तलवार आणि घोड्यावर स्वारी हिच अहिल्या आमची आहे. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर अहिल्या खचून गेल्या स्वतः चा मुलगा वाईट संगतीत आहे याची खंत त्यांना सतावत होती तरी सुद्धा राज्यकारभाराची सुत्रे हातात घेऊन प्रभावी पणे शासन केले.
_मुलांच्या मृत्युने अहिल्यामाई खचून गेल्या ह्याच संधिचा फायदा घेऊन रघुनाथ पेशव्याने होळकर साम्राज्यावर हल्ला करण्याचा निर्णय झाला. पेशवा चाल करून आपल्यावर येणार हि खबर अहिल्यामाई यांना मिळताच अहिल्यामाई होळकर यांनी पेशव्याला पत्युत्तर दिले. तु माझ्या वर चाल करून येतोस युद्धासाठी मी ही तयार आहे. युद्ध रणांगणात होणार पण एक गोष्ट लक्षात घे मी महिलांची फौज घेऊन रणांगणात उतरणार आहे. मला माझी काळजी मुळीच नाही पण तु जिंकलास तर इतिहास म्हणेल महिलां विरोधात लढला, आणि हरला तर इतिहास म्हणेल महिलाकंडुन हरला. थोडक्यात शत्रुला रणांगणात हरवण्या अगोदर त्याला त्याच्या मनात हरवण्याचे कौशल्य अहिल्यामाई यांच्या कडे होते. महिलांना घराच्या बाहेर पडण्याचा अधिकार नसताना अहिल्यामाई होळकर यांनी महिलांची सैन्य फलटण करणारी पहीली शासनकर्ती होय. महिलांना सैन्यात भरती करणारी व महिलांना सन्मान प्राप्त करून देणारी अहिल्या व्यवस्थेच्या विरोधात होती हे सिद्ध होते. अहिल्यामाईचा क्रांतीकारी इतिहास आम्हाला भक्तीचा करून सांगितला जातो म्हणून अजून आम्हाला खऱ्या अहिल्या कळाल्याच नाही. शासन कसे करावे याचे यशस्वी उदाहरण म्हणजे अहिल्यामाई होळकर होत. कोणत्याही जाती धर्माचा द्वेष नाही, कोणत्याही अंधश्रद्धा नाही, विज्ञानवाद देउन लोकांना जागृत, हुशार करून त्यांचे कल्याण करणाऱ्या अहिल्यामाई होत. वैयक्तिक खर्चासाठी एकही रुपया खर्च न करता राज तिजोरीतील सर्व पैसा जनतेच्या कल्याणावर खर्च करणाऱ्या अहिल्यामाई होत. स्वतः वर खर्च करण्यासाठी त्या खाजगी कोशातील पैसा वापरत होत्या हि बाब आजही राज्यकर्ते लोकांना शिकण्यासारखी आहे. वाटसरुंना पिण्यासाठी पाणपोई अहिल्यामाई होळकर यांनी खाजगी कोषातून निर्माण केल्या. प्रवासासाठी वाहणांची सोय नव्हती, लोक पायी पायी चालत जात असेल चालताना थकवा आला तर थोडी विश्रांती मिळामी म्हणून रस्त्यावर मंदिरे बांधली. मंदिर बांधून तेथे भक्ती नाही तर चालण्यासाठी निर्माण व्हावी म्हणून विश्रांती केंद्र होते. गरिब निर्धन जनता सुद्धा भुकमरीने मरता कामा नये म्हणून मंदिरामध्ये त्यांना जेवन उपलब्ध करून दिले जात होते. ही बाब आपण अहिल्यामाई होळकर यांच्या कडून शिकण्यासारखी आहे. मंदिरा प्रमाणेच मशीदीसाठी सुद्धा अहिल्यामाई यांनी मदत केली होती. जाती धर्माला वाव न देता मानसाला व त्याच्या कर्माला प्राधान्य देणाऱ्या होत्या. एकंदरीत आपण विचार केला तर प्रस्थापित व्यवस्था विषमतावादी, अन्याय कारी असताना एवढे क्रांतीकारी पाऊल उचलने म्हणजे व्यवस्थेला लाथाडणे होय._
अहिल्यामाई होळकर यांच्याकडे सद्गुणाची खाण होती. प्रशासन सांभाळताना कोणताही भेदभाव वा कोणा बद्दल जास्त आपुलकी किंवा दुरावा सुद्धा नसे. स्वतः चे चारित्र्य सांभाळून समाजाला नैतिक शिक्षण घेण्यासाठी अहिल्यामाई सक्रिय होत्या. खंडेराव पैशाची उधळपट्टी करायचे तर त्यांच्या खर्चावर निर्भंध लादुन खर्च मर्यादित केला होता. एका वर्षामध्ये किती खर्च करायचा हे ठरवून दिले होते. परंतु खंडेराव यांनी दोन महिन्यात पुर्ण रक्कम खर्चुन टाकली आता खंडेराव पुन्हा पैसे मागायला येणार याची कल्पना असताना देखील त्यांना पैसे द्यायचे नाही असा निर्धार करणाऱ्या अहिल्यामाई होत. अहिल्यामाईचा हा गुण आजच्या राजकारणी लोकांकडे दिसतो का? जनसेवेच्या नावाखाली स्वतः ची झोळी भरणारे आजचे भ्रष्ट प्रव्रतीचे लोक आहिल्मामाई कडून आदर्श घेतील का? आमदार खासदार दहा पिढ्याची कमाई करणारे आजचे शाषक आणि स्वतः चा खर्च खाजगी तिजोरी मधून करणाऱ्या अहिल्यामाई होळकर म्हणून आम्हाला वंदनीय व आदर्श आहेत. जयंती साजरी करताना फक्त अहिल्यामाई यांना हार हार घालून जमणार नाही तर अहिल्यामाई यांनी चालवलेले शाषण पुन्हा त्याच पद्धतीने जर चालले तर खऱ्या अर्थाने अहिल्यामाई होळकर यांची जयंती साजरी करण्याचे व अहिल्यामाई होळकर यांना वंदन केल्याचे सार्थक होईल. लोककल्याण फक्त बोलण्याने होत नाही तर लोक कल्याण करण्यासाठी रक्तात ईमानदारी असावी लागते. आणि ती इमानदारी अहिल्यामाई कडे होती. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा वा अनिष्ट रुढी अहिल्यामाई होळकर स्विकारल्या नाही अथवा समर्थन दिले नाही. उलट त्या बंध कशा करता येतील यावर त्यांचा जास्त भर होता. जी व्यवस्था अंधश्रद्धा पसरवते, जो धर्म मानसिक स्वातंत्र्य देत नाही असा धर्म अहिल्यामाई यांनी नाकारून मानवता वादी धर्म त्यांनी स्विकारला. हुंडा पद्धतीला कडाडून विरोध केला. व्यसनमुक्ती वर काम करणारी पहिली शासनकर्ती म्हणले तरी वावगे ठरणार नाही. लोकांनी व्यवसनापासुन दुर राहण्यासाठी अहिल्यामाई होळकर यांनी काम केले. उजेडातून अंधारात घेऊन जाणारा धर्म अहिल्यामाई यांनी नाकारून अंधारातून उजेडात जाणारा धर्म त्यांनी स्विकारला. यावरून लक्षात येते कि अहिल्यामाई होळकर दैववादी वा धार्मिक नव्हत्या तर कर्तृत्ववान आणि विज्ञानवादी होत्या. जर धार्मिक आणि भक्ती करणाऱ्या अहिल्यामाई असत्या तर नवरा गेल्या नंतर सती गेल्या असत्या, धार्मिक असत्या तर हातात तलवार घेतली नसती, धार्मिक असत्या तर ग्वाल्हेर पर्यंत ठसा उमटवला नसता. धार्मिक असत्या तर धर्माच्या विरोधात जाऊन बंड केले नसते. धार्मिक असत्या तर नवरा, सासरा व मुलगा गेल्यानंतर खंबीर राहील्या नसत्या. अहिल्यामाई लोककल्याणकारी होत्या, लोकांच्या हितासाठी कारभार करणाऱ्या होत्या म्हणून तर त्या पुण्यश्लोक नाही तर लोकमाता आहेत. अहिल्यामाई होळकर यांना धार्मिक दाखवून त्यांच्या कर्तृत्वावर पडदा टाकण्याचे काम केले जाते. कारण आपण धर्माशी भावनिक आहोत. धर्माच्या नावाखाली आपण काहीही करतो पण सत्य विचारासाठी काहीच करण्याची हिंमत होत नाही. धार्मिक दाखवून अहिल्यामाई यांना मर्यादित करण्याचा ठाव या व्यवस्थेने केला. म्हणून आजही आम्ही खऱ्या अहिल्यामाई यांना समजून घेऊ शकलो नाही. अहिल्यामाई समजून घेताना त्या लोककल्याणकारी होत्या याचा विसर मात्र पडत नाही. बहुजन समाजाला जागृत करण्याचे काम अहिल्यामाई यांनी केले. लोककल्याणकारी लोकमाता अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने सर्वांना सदिच्छा. अहिल्यामाई घराघरात पोहण्यासाठी प्रयत्न कराल हि अपेक्षा.
************
विनोद पंजाबराव सदावर्ते
रा. आरेगाव ता मेहकर
मोबा: ९१३०९७९३००
इथे हि वाचा
संजय राऊत -मोदींनी वर्क फ्रॉम होम करायला सांगितलंय म्हणून मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होम करतायेत
देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६५ हजार ७९९
देशाचं नाव बदला! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; २ जूनला सुनावणी
One thought on “लोक कल्याणकारी लोकमाता: आहिल्यामाई”