धुबड – शुभ की अशुभ अजून घ्या यामागचे रोचक तथ्य

3
14

जगातील अनेक संस्कृतीचा अभ्यास करताना मन अचंभित होते. कित्येक मान्यता, श्रद्धा-अंधश्रद्धांचे जाळे या संस्कृतींनी विणवून ठेवले आहे. भारतीय संस्कृतीत तर अनेक मान्यता, श्रद्धा-अंधश्रद्धांचा महापूर आहे कि काय अशी अवस्था! मनुष्याने अनेक पशु-पक्षांना तर याचे प्रतीकच बनविले आहे. निसर्गचक्राचा अविभाज्य घटक असलेले हे वृक्ष, पशु-पक्षी यांना शुभ-अशुभ असण्याचा ठप्पा मारण्यात आला आहे. यामुळे भारतीय संस्कृतीच्या परंपरेत यांना कधी अतिमानाचे स्थान आहे तर कधी ते आपल्या तिरस्काराचे मानकरी होतात.

“घुबड” हा प्रचंड सुंदर असणारा पक्षी देखील अशाच अंधश्रद्धेचा बळी ठरला आहे. अत्यंत अशुभ मानला गेलेला हा पक्षी भारतीय संस्कृतीत “नावडता” आहे. मात्र तरीही तो लक्ष्मीचे म्हणजेच धनाच्या देवतेचे वाहन आहे. बंगाल मध्ये कधीमधी पूजेत स्थान प्राप्त हा पक्षी मात्र इतर भारतीयांसाठी नेहमीच “अस्पृश्य” राहिला आहे. एक अंधश्रद्धा ऐकल्यानंतर मात्र मन खूप विषण्ण झाले. दिवाळीच्या दिवसात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या पक्षाला काही ठिकाणी (अनेक राज्यांत) प्रचंड मागणी असते. या दिवशी पूजा झाल्यानंतर लक्ष्मी आपल्या घरातून परत जाऊ नये म्हणून तिचे वाहन असलेला घुबड या पक्ष्याचा बळी दिला जातो! मनुष्य स्वार्थापोटी किती निर्दय होऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण. तशी अनेक पशु-पक्ष्यांना येथील अंधश्रद्धेने बळी दिला जातो हे सर्वांनाच माहित आहे. त्यांच्यावर “असे संस्कार” हजारों वर्षे करणारा खरा दोषी आहे! असो…

घुबड आठवायचे कारण म्हणजे परवा माझ्या पत्नीने बाजारातून एक खूप सुंदर पितळी घुबड घेऊन आली. खूप वर्षांपूर्वी मोरादाबाद येथून मी अनेक भरीव पितळेचे पशु पक्षी मुलींसाठी आणले होते. अतिशय टुमदार असलेली ही घुबड प्रतिमा मी बुद्धमूर्ती जवळ ठेवली. त्याला कारण ही तसेच आहे. नाशिकची प्रसिद्ध “त्रिरश्मी बुद्ध लेणी” ही भारतातील १२०० लेणीं मधील एकमेव लेणीं आहे कि जिथे “घुबड” हा पक्षी कोरला आहे. घुबड हा पक्षी ग्रीक आणि रोमन संस्कृतीत एक अतिशय शुभ पक्षी मानला गेला आहे. त्यांच्या नाण्यांवर देखील हा कोरण्यात आला आहे तर तेथील अनेक चित्रांत, शिल्पकलेत त्याला मानाचे स्थान आहे. इ.स.पूर्व ५०० मध्ये घुबडाचे चित्र असलेले नाणे गीक मध्ये काढण्यात आले होते. नाशिक मध्ये क्षत्रप (खरं तर सत्राप हे त्यांचे मूळ नाव) नहपानाने नाशिक मध्ये आल्यानंतर त्रिरश्मी डोंगरावर अनेक लेणीं येथील भिक्खू संघाला दान दिल्या. क्षत्रपांबरोबर त्यांचे कारीगर ही होते. त्यातील काहींनी येथील लेणींतील शिल्पकाम केले असावे. घुबड हा पक्षी या ग्रीक कारीगाराने कोरला असावा. इथला शिलालेख त्याची साक्ष देतोय. नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणींतील हा अतिशय देखणा व तीक्ष्ण नजरेने आपल्या सावजा कडे रोखून बघणारा घुबड बघायला मात्र नक्की या…महाराष्ट्रातील बुद्ध लेणीं मध्ये केवळ येथेच तो पाहायला मिळतो….

अतुल मुरलीधर भोसेकर
९५४५२७७४१०

टीप :- वरील लेखाशी TOM सहमत असेल असे नाही, लेखक बौध्द संस्कृती विषयी खूप चांगल्या प्रकारे जाणकार आहेत, तसेच महाराष्ट्र राज्य मध्ये लेणी संवर्धनासाठी मोठे कार्य केले आहेत आणि करत आहेत, तसेच भारतातील तरुणांना पाली भाषेचे प्रशिक्षण दिले आहेत.