कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान जपणारा ‘प्रफुल्ल’!

0
23

नवी मुंबई, दि. 5 – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे नियम पाळून कोकण विभागीय माहिती कार्यालयातील प्रफुल्ल पाटील या कर्मचाऱ्याचा लग्नसोहळा नुकताच पार पडला.
कर्तव्य दक्षता व सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून संपन्न झालेल्या या सोहळ्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माहिती व जनसंपर्क सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दखल घेतली असून प्रफुल्ल पाटील यांस शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रफुल्ल पाटील हे विभागीय माहिती कार्यालयात २७ जुलै २०१८ रोजी अनुकंपा तत्त्वावर शिपाई या पदावर रुजू झाले. श्री. पाटील यांचे आई आणि वडील दोघेही हयात नसल्याने ते एकटेच राहतात. त्यांच्या दोन्ही बहिणींची लग्न झाली आहेत. प्रफुल्ल एकटा राहत असल्याने जेवण बनवणे यापासून घरातील सर्व कामे तो स्वत:च करीत होता. अशा परिस्थितीत त्याने लग्न करायचा निर्णय घेऊन वधू शोध मोहीम सुरू करण्यास घरातील मान्यवर नातेवाईकांना परवानगी दिली.

लग्नासाठी प्रफुल्लच्या कुटुंबातील वरिष्ठांनी पेण मधील आंबिवली गावातील मुलगी पसंत केली. लग्नाची तारीख ठरवताना मुलीकडील मंडळींनी लग्न फेब्रुवारीमध्ये करण्याचा आग्रह धरला. परंतु आर्थिक अडचणींमुळे प्रफुल्लने लग्न एक ते दोन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याने मुहूर्तानुसार २ मे ही तारीख ठरवली होती. मात्र, थाटामाटात लग्न करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रफुल्लला अशा पद्धतीने लग्न करावे लागेल याची पुसटशीही कल्पना नव्हती.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने १९ मार्च तर केंद्र शासनाने २३ मार्च रोजी लॉकडाऊन घोषित केला. सर्व प्रकारचे सामाजिक, धार्मिक कार्यक्रम समारंभ यांना बंदी घालण्यात आली. अशा परिस्थितीतही प्रफुल्ल निश्चिंत होता. कारण त्याला असे वाटत होते की, मे महिना येईपर्यंत स्थिती सामान्य होईल आणि आपले लग्न सुखरुप पार पडेल. परंतु, एखादे लग्न करायचेच असेल तर मुलीकडील ५ आणि मुलाकडील ५ व्यक्ती अशा मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत शासनाची पूर्व परवानगी घेऊन, शासनाने लागू केलेल्या सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियमांचे पालन करुन लग्नविधी करण्याची मुभा शासनाने दिली.

रोजच्या शासकीय कामात निघणाऱ्या बातम्या, येणारी वृत्तपत्रे, दूरचित्रवाणीवर दिसणारे सारे दृश्य आणि कोरोना संदर्भात शासन करीत असलेले प्रयत्न लक्षात घेऊन प्रफुल्लने पूर्ण शासन नियम पाळून लग्नाचा निर्णय घेतला. घरातील सर्व नातेवाईकांची समजूत काढली. त्याची पत्नी दिपांजली हिनेही साधेपणाने लग्नाला होकार दिला. प्रफुल्लला लग्न अजून सहा महिने पुढे ढकलून थाटामाटात करता आले असते. परंतु त्याने सामाजिक जबाबदारी ओळखली आणि सध्या चालू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्वत:चे लग्न शासनाने ठरवून दिलेल्या नियमांच्या अधिन राहून केले. शासकीय घडामोडींच्या बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या या योद्ध्याने या अशा कठीणसमयी आपले सामाजिक भान जपले, हे विशेष!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here