मुंबई, दि. १६ : रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केंद्र शासनाकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे केंद्र शासनाने एनडीआरएफ निकषात बदल करून सुधारित निकषानुसार मदत करावी, अशी मागणी उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, विधी व न्याय राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी केंद्रीय पथकाचे अध्यक्ष रमेश कुमारजी (सह सचिव, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) यांना निवेदनाद्वारे केली.
रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी केंद्र शासनाचे आंतर मंत्रालयीन पथक कालपासून तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आले आहे. काल आदिती तटकरे यांनी पथकाची भेट घेवून रायगड जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.
कु. तटकरे म्हणाल्या, १८९१ नंतरचे सर्वात मोठे असे चक्रीवादळ दि. ३जून २०२० रोजी झाले आहे. फयान, सायक्लॉन वादळाचा मुंबईवर मोठा परिणाम झाला होता. एनडीआरएफ व एसडीआरएफची सध्याचे निकष निसर्गसारख्या चक्रीवादळाला पूरक नाहीत. केंद्र शासनाकडून नुकसानग्रस्तांना देण्यात येणारी भरपाई ही सध्याच्या निकषानुसार अपुरी आहे. चक्रीवादळामुळे झालेले नुकसान हे मोठे असून नुकसानग्रस्तांचे झालेल्या नुकसानीनुसार पंचनामे सुरू आहेत.