धक्कादायक! भाजप पदाधिकाऱ्यासह चौघांनी केला वीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

Spread the love

भोपाळ | देशातील बऱ्याच धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. यातच मध्य प्रदेशमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. मध्यप्रदेशच्या शहडोल जिल्ह्यात एका 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे भाजप पदाधिकाऱ्यासह चार जणांनी हा सामूहिक बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शहडोल जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष कमल प्रताप सिंह म्हणाले, की याप्रकरणी विजय त्रिपाठीचं नाव समोर आल्यानंतर लगेचच त्याला जैतपूर मंडळाच्या अध्यक्ष पदावरुन कमी करण्यात आलं आहे. त्यासोबतच पक्षातील त्याचं प्राथमिक सदस्यत्वही हटवण्यात आलं आहे.

अतिरिक्त पोलीस अधिक्षक मुकेश वैश्य यांनी सांगितलं, की पीडितेचं अपहरण करुन तिला जैतपूर पोलीस ठाण्याच्या भागात असलेल्या गाडाघाट परिसरातील फार्म हाऊसमध्ये घेऊन गेले होते. त्याठिकाणी नेल्यानंतर त्यांनी तिला जबरदस्तीनं दारु पाजली आणि सलग दोन दिवस तिच्यावर बलात्कार केला. पीडितेची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, वैश्य यांनी सांगितलं, की घटनेनंतर आरोपींनी 20 फेब्रुवारीला पीडितेला तिच्या घरासमोर गंभीर अवस्थेत फेकून दिले होते. त्यानंतर पीडितेनं रविवारी 4 जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी चारही आरोपी विजय त्रिपाठी, मुन्ना सिंह, राजेश शुक्ला आणि मोनू महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या चारही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा तपास करत आहेत. विजय त्रिपाठीची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर जिल्हा अध्यक्ष म्हणाले, अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या कार्यकर्त्यांची भाजपला आवश्यकता नाही.

 


Spread the love