मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे शुक्रवारी जनतेशी संवाद साधला. पण या संवादांमध्ये लॉकडाऊनबद्दल कोणताही निर्णय त्यांनी घोषित केला नाही. तर येत्या दोन दिवसांमध्ये चर्चा करून निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं. शुक्रवारी झालेल्या या फेसबुक लाईव्हमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला नियम पाळण्याचं आवाहन केलं, तसेच कडक निर्बंध लागू करण्यास भाग पाडू नका असंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी दोन दिवस वेळ घेणार असं सांगितल्यानंतर त्यांच्या बैठकांचे सत्र सतत सुरू आहे. या दरम्यान महाराष्ट्रात लॉकडाऊन हा एकच पर्याय कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गरजेचा असल्याचं दिसून येत आहे. सुरुवातीला मिनी लॉकडाऊन करण्याचा विचार सरकारतर्फे करण्यात येत होता, परंतु कोरोना प्रादुर्भाव अतिशय वेगाने वाढत असल्याने कडक लॉकडाऊन हा एकच पर्याय शिल्लक राहतो.
मुख्यमंत्र्यांनी शनिवारी राज्यातील वृत्तपत्र संपादक, मालक आणि वितरक यांच्यासोबत एक बैठक घेतली आणि यासंदर्भात चर्चा केली. या चर्चेदरम्यान आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण ही चिंतेची बाब असून लाॅकडाऊन शिवाय सध्या कोणता पर्याय नसल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बोलून दाखवलं. त्याबरोबरच कठोर निर्बंध लावून कोरोना रोखण्यासाठीचे प्रयत्न सरकारतर्फे करण्यात आले, पण लोक नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात लाॅकडाऊन करून हळूहळू सर्व सेवा पूर्वपदावर आणल्या तर त्याचा फायदा कोरोना रोखण्यासाठी नक्कीच होऊ शकतो, असं सूचक वक्तव्य संपादक आणि मालकांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
शनिवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वृत्तपत्राचे संपादक मालक आणि वितरक यांच्याशी लाॅकडाऊन शिवाय काही दुसरा पर्याय आहे का? यासंदर्भात चर्चा केली आणि कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संदर्भात काही सूचना केल्यास त्यावर सकारात्मक दृष्टीने विचार केला जाईल असं संपादकांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.