मृत्यू घराचा पहारा करतांना” :- पोलीस नाईकांचे मनोगत

0
7

मी, पोलीस नाईक, विनोद पितांबर अहिरे, पोलीस मुख्यालय जळगाव. गेली तेरा दिवसांपासून या कोरोना कक्षाच्या इमारतीला पहारा(गार्ड ड्युटी) करीत आहे. पण मी आज या कक्षाला “मृत्य घर” संबोधतो आहे. आणि होय हे मृत्यु घरच आहे.तथा मृत्यूपेक्षा ही भयंकर आहे.कारण मी आतापर्यंत अनेक बंदोबस्त, पहारे केले आहेत.अनेकदा तर आत्महत्या खून यासारख्या क्लिष्ट प्रकरणांमध्ये “व्हिसेरा”राखीव ठेवण्याची विनंती करून स्वतः शवविच्छेदन गृहात उपस्थित राहून जेव्हा डॉक्टर त्या मृत मानवी देहाचे वेगवेगळे अवयव परीक्षणासाठी बाहेर काढतात.तेव्हा मात्र मला हीआणि डॉक्टरांना ही भीतीचा लवलेश सुद्धा शिवत नव्हता.परंतु आज मात्र त्यांनाही या “कोरोना कक्षात” रुग्णसेवा देताना आणि मलाही,पहारा देतांना मृत्यूच्या एका अनामिक भीतीने पछाडले आहे. मला या मृत्यु घराच्या फाटकावर पहारा देताना मला एका बाजूला माझा तीन वर्षाचा बंडू (माझा लहान मुलगा) बोबड्या स्वरात पप्पा पप्पा म्हणत दिसत आहे. आणि दुसर्‍या बाजूला माझी मातृभूमी दिसत आहे. या क्षणाला प्रचंड घालमेल माझ्या जीवाची झाली आहे. पण क्षणात माझ्या मनात असाही विचार येतो की, अशी द्विधा मनस्थिती करून कशी चालेल. ही मातृभूमी आपल्याला का सहजासहजी थोडीच मिळाली आहे. माझ्या अनेक शूर वीर बांधवांनी या स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्निकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली. तेव्हा कुठे हे स्वतंत्र आपणास उपभोगण्यास मिळालं आहे. जर स्वतंत्रच नसतं तर आपण पोलीस तरी झालो असतो का? मिसरूड फुटण्याच्या वयातच भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, अशपाक यांचाही तर परिवार असेलच ना मग त्यांनी तर एका क्षणाचा विचारही न करता “वंदे मातरम” म्हणत म्हणत ते फासावर चढले आणि या मातृभूमीला आलिंगन दिले. होय मी ही तयार आहे. माझ्या मातृभूमीसाठी इथला मृत्यू स्वीकारायला,पण इथला मृत्यू आपल्या पुरता मर्यादित नसून तो आपल्या अनेक आप्तस्वकीयांना आपल्या “कवेत”घेत असतो. आणि अप्रत्यक्षपणे माझ्या “मातृभूमीवर” पुन्हा हल्ला चढवत असतो. म्हणूनच की काय या “कोरोना कक्षाच्या” इमारतीला पहारा करताना मला भय वाटत आहे.म्हणूनच मी याला आज मृत्यू घर संबोधतो आहे.जेव्हा जेव्हा माझा येथे पहारा सुरू असताना येथील एखाद्या रुग्णाचा मृत्यू होतो. तेव्हा तेव्हा त्या मृत व्यक्तीच्या घरातील

रक्ताच्या लोकांना आपल्या आईच्या,बापाच्या,मृत शरीराला स्पर्श तर सोडाच,पण त्याला जवळ देखील येऊ दिले जात नाही. ते बिचारे कुठेतरी, कोपऱ्यात हृदय पिटाळून टाकणारा आक्रोश ते करीत असतात. त्यावेळेला त्यांचं मी एक माणूस म्हणून त्यांचा हात माझ्या हातात घेऊन त्यांचं साधं सात्वन देखील करायला जाऊ शकत नाही.फक्त लांबूनच त्यांच्या दुःख वेदना माझ्या या उघड्या डोळ्यांनी मी पहात असतो. म्हणूनच मी आज या “कोरोना कक्षाला” “मृत्यू घर” संबोधतो आहे. आणि होय हे मृत्यूचे घरच आहे.या कक्षाच्याआतअसलेले “देवदूत” (डॉक्टर) आपल्या एका हातात मृत्यू आणि दुसऱ्या हातात मेडिसन रुपी शास्त्र घेऊन या कोरोना नामक राक्षसाचा मुकाबला करीत आहेत.

पण तो दिवसेंदिवस त्यांच्यावर वरचढ होताना दिसत आहे. कारण आतापर्यंत अनेक देवदूत (डॉक्टर)माझे सहकारी या राक्षसाची लढताना धारातीर्थी पडत आहेत. आणि मला या क्षणाला एकाच गोष्टीचं शल्य वाटतं की, मी त्यांना काही मदत करू शकत नाही काही संरक्षण देऊ शकत नाही. कारण आतापर्यंत या “मातृभूमीवर” जेव्हा जेव्हा अंतर्गत संकट आलीत तेव्हा तेव्हा केंद्रस्थानी मीच होतो (म्हणजे सर्व पोलीस) आणि याच निधड्या छातीने त्या संकटांचा मुकाबला करण्याची ताकत माझ्या “वीर बाहू” मध्ये होती. पण आता मात्र माझ्या सहकाऱ्यांचे आणि माझ्या मायबाप जनतेचे या कोरोना नामक राक्षसाच्या हातून धडाधड मुडदे पडत असतांना मला मात्र सुन्न होऊ़न पहावं लागत आहे. आणि हो “जनता” माझ्यासाठी माय बापच आहे. कारण त्यांच्याच पैशातून मला पगार मिळतो आणि माझे कुटुंब चालते, त्याच माझ्या मायबाप जनतेचं हा “कारोना” नामक राक्षसापासून मी त्यांचे रक्षण करू शकत नाही. यासारखे दुर्दैव दैवदुर्विलास जीवनात कोणते असू शकते.भलेही आज माझी मायबाप जनता माझ्यावर फुलांचा वर्षाव करीत आहे. मला योद्धा म्हणून संबोधते आहे.

पण तुम्हाला सांगतो माझ्या मनातल्या मनात मला करंटेपणा चा भास होत आहे. कारण मी इतका हताश आणि भयगंडीत होऊन, बंदोबस्त, पहारा, कर्तव्य कधीच केले नव्हते. आणि कर्तव्य पार पाडीत असताना मला माझ्या मृत्यूची भीती ही, कधीच वाटली नव्हती. पण आता मला स्वतःला सुरक्षित ठेवून मला ड्युटी करावी लागतआहे. कारण तसं केलं नाही तर मीही या राक्षसाच्या तावडीत सापडेल आणि माझी आई-वडील, कुटुंब सहकारी, शेजारी माझ्यासकट आपसूकच या राक्षसाच्या “गुहेत” जातील त्यानंतर मात्र हा राक्षस असुरी आनंद घेत घेत त्यांचे एकेक करून धडाधड मुडदे पाडिल आणि तेव्हाही मी काहीच करू शकणार नाही फक्त हतबल होऊन माझ्या नातेवाईकांचे आणि जनतेचे मृत्यू माझ्या या उघड्या डोळ्यांनी मला पाहावे लागतील. आणि जेव्हा आपल्या डोळ्यादेखत आपल्या आईचा, बापाचा, मुलाचा, पत्नीचा, सहकाऱ्यांचा,मृत्यू होतो तेव्हा, आपण काहीच करू शकत नाही तेव्हा “करंटे” पणाची जाणीव होणार नाही तर काय गर्वाने छाती फुगेल!आणि म्हणूनच मी आज या “कोरोना कक्षाला” मृत्यूचे घर संबोधतो आहे.

आतापर्यंत खूप बंदोबस्त केलेत. पहारे केले, मंत्री, आमदार, मोठे अधिकारी,यांचे अंगरक्षक ड्युटी केली तेव्हा मी असताना ते माझ्या भरोशावर ते अणि तुम्ही ही मुक्तपणे संचार करीत असत. आणि आलाच जर कोणी एखादा शत्रू समोर तर माझ्या नाईन एम एम पिस्टल मधील गोळीने त्याला क्षणात कंठस्नान घालण्याची ताकद माझ्या भूजांमध्ये मध्ये नक्कीच होती. पण आता मात्र शत्रु अदृश्य असल्यामुळे मी काहीच करू शकत नाही. अता माझी शस्त्र ही बदललेली आहेत. आणि ड्युटी चे स्वरुपही बदलले आहे. मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की, माझी पिस्टल, माझी रायफल, माझी अश्रुधुराच्या नळकांड्या यासारखे शस्त्र सोडून मला शस्त्र म्हणून सँनीटायझर, ग्लोज, मास्क,फेसगार्ड अशी वापरावी लागतील आणि माझी अवस्था एका पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होऊन मला पहारा, कर्तव्य करावे लागेल आणि अजून किती मृत्यू बघावे लागतील म्हणून मी आतुर होऊन माझ्या त्या शास्त्रज्ञ बांधवांची वाट बघतो आहे. की जे आज जीवाचे रान करून या राक्षसाचा मुडदा पाडण्यासाठी आपले शस्त्र परजत आहेत.पण दुर्दैवाने अजूनही त्यांची शस्त्रे पूर्णपणे परजली गेली नाहीत. जोपर्यंत ते शास्त्रज्ञ बांधव आपली शस्त्र परजून या कोरोना नामक राक्षसाचा खात्मा करीत नाही. तोपर्यंत तुम्ही फक्त घरातच बसा….
म्हणजे तुमचा मृत्यू आम्हाला हाताश होऊन उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ न येऊ देता आणि आम्हाला तुमचे संरक्षण करता येत नाही म्हणून करंटेपणाची जाणीव न होऊ द्यायची असेल तर अपण विनाकारण घराबाहेर पडून त्या मृत्यू घराच्या दिशेने न जाता आपण घरातच सुरक्षित रहा आणि त्या “मृत्यू घराला” कायमचे टाळे लावा……
जय हिंद जय महाराष्ट्र
आपला
विनोद पितांबर अहिरे, दक्षता नगर,
पोलीस मुख्यालय जळगाव
9823136399

इथे हि वाचा 

धुबड – शुभ की अशुभ अजून घ्या यामागचे रोचक तथ्य

डॉ.हर्षदीप कांबळे सर,(IAS) यांच्या सहाय्यता मधून ठाकरवाडी, खेड,पुणे येथील आदिवासी 60 कुटुंबांना धान्य वाटप!

#महाराष्ट्रानेआणखीनएकहिरागमावला 😥😢 वडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई निलेश जोंधळे यांचे थोड्यावेळापूर्वी कोरोना आजाराने निधन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here