‘कोरोना’ची जागतिक महामारी;पुरवठा विभागामुळे टळली उपासमारी!

0
36

ढकांबे गावात गरीब कल्याण अन्न योजनेची प्रभावी अंमलबजावणी
नाशिक, दि.17 (जिमाका वृत्तसेवा) : ‘कोरोना’च्या संकटामुळे जग हादरलं आणि हा हा म्हणता म्हणता ते संकट आपल्या दाराशी पोहोचून त्यानं आपल्या भोवतालचं वातावरणही बदललं. या प्रकारची स्थिती यापूर्वी कधी पाहिली नव्हती. पण त्या त्या काळानुसार घडलेल्या लहान-मोठ्या बदलांना किंवा अगदी धक्का देणाऱ्या घटनांना मात्र आपण समाज म्हणून यापूर्वीही सामोरे गेलो आहोत. व्यक्तींचा समूह म्हणून आपल्या असणाऱ्या सार्वत्रिक जीवनावर परिणाम करणाऱ्या शासन-प्रशासनाच्या पातळीवर मात्र प्रचंड फरक जाणवतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून दिंडोरी तालुक्यातील ढकांबे या आदिवासीबहुल गावात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे 100 टक्के धान्य वितरित झाल्याचे पाहून हा फरक अधिकच सकारात्मकतेने अधोरेखित होतो.

नाशिक जिल्ह्याच्या मुख्यालयापासून दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गाव 13 किमी अंतरावर आहे. 2 हजार 890 लोकसंख्येच्या या गावात सुमारे 500 कुटुंबं राहतात. शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशनचे धान्य मिळण्यासाठी आवश्यक असणारी आधार जोडणी या गावात 100% पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याला स्वस्त धान्य दुकानातून मोफत गहू, तांदूळ व इतर धान्य वाटपाचे काम लॉकडाउन कालावधीत सहजपणे पूर्ण करण्यात आले आहे. हे धान्य वाटप करताना गावातील स्वस्त धान्य दुकानदारामार्फत राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने ठरवून दिलेल्या लॉकडाउनच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येतआहे. त्यात प्रामुख्याने वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरणाच्या नियमांचे अत्यंत कसोशीने येथील ग्रामस्थ देखील पालन करीत आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी स्वस्त धान्य दुकानामार्फत सामाजिक अंतर पाळण्यासाठी दुकानाच्या बाहेरील मोकळ्या जागेत ठराविक अंतरावर गोल किंवा चौकोनी रकाने आखून तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित अडथळे लावून धान्याचे वाटप करण्यात येते. या रेशन दुकानावर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकासाठी सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहे, त्याचप्रमाणे येणारा प्रत्येक ग्राहक देखील कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी स्वत: सोबतच इतरांची काळजी म्हणून मास्क किंवा रुमाल बांधूनच दुकानात येतात. ढकांबे हे आदिवासी बहुल गाव असले तरी येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील सर्व नागरिक काळजी घेताना दिसून येतात.

गेल्या दीड महिन्यापासून ग्रामीण भागातील,आदिवासी वाड्या पाड्यातील गोरगरीब, मोलमजुरी करणाऱ्यांना हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली होती. हातावर पोट असणारा व दिवसभर काबाडकष्ट करून कुटुंब पोसणारा मजूर वर्ग या ‍परिस्थितीतमध्ये अधिक प्रमाणात होरपळला जात होता. यावर मात करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येकापर्यंत मोफत धान्य पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसारच ढकांबे गावांमध्ये या गावातील पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून व लाभार्थ्यांच्या सहभागामुळे या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे.
राष्ट्रीय आपत्तीच्या याकाळात गरीब, मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागविणारा कुठलाही नागरिक अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची राज्य शासनाच्या पुरवठा विभागाने प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे ढकांबे गावातील काही महिला लाभार्थ्यांच्या या बोलक्या प्रतिक्रिया आहेत :

कोरोना संचारबंदीच्या कठीण काळात आम्हाला वेळेत धान्य उपलब्ध झाले. त्यामुळे आमच्या कुटुंबाची महिनाभराची सोय झाली आहे.त्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. – हौसाबाई कडाळे, ढकांबे, ता. दिंडोरी, जि. नाशिक

गेल्या महिना दीड महिन्यापासून हाताला काम नाही, पैसा नाही त्यामुळे भाजीपाला, अन्नधान्य या गोष्टींचा तुटवडा जाणवत असताना महाराष्ट्र शासनाने प्रत्येकी 5किलो गहू, तांदूळ यांचे वाटप केल्याने आमच्या लॉकडाडनमधल्या जगण्याला शासनाचा भरीव आधार मिळाला आहे. – मीना माळेकर, ढकांबे, ता. दिंडोरी, जि. नाशिक

आमच्यासारख्या गरीबांना स्वस्त धान्य दुकानांच्यामार्फत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी 5 किलो गहू व तांदूळ हे धान्य मिळत आहे. 8 रूपये किलो प्रमाणे गहू व 12 रूपये किलो प्रमाणे तांदुळ इतक्या कमी दरात धान्य उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आम्ही शासनाच्या या कामावर समाधानी आहोत. – रंजना नागरे, ढकांबे, ता. दिंडोरी, जि. नाशिक

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांसाठी एप्रिल 2020 या महिना अखेरपर्यंत जिल्ह्यात 1 लाख 81 हजार 884 क्विंटल इतके धान्य वाटप करण्यात आले आहे. हे धान्य वाटप उचललेल्या धान्याच्या सुमारे 98 टक्के इतके आहे, अशी माहिती यासंदर्भात बोलतांना जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here