पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिल्या बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!

अमरावती : तथागत गौतम बुद्ध यांनी शांती, प्रेम, मानवतेचा संदेश जगाला दिला. त्यांचे विचार अखिल जगाला विधायक दिशा देणारे आहेत. त्यांच्या या विचारातच सर्व संकटावर मात करण्याची नवीन ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता व नवचैतन्याचे सामर्थ्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी तथागतांना त्रिवार वंदन केले. यावेळी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा देताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कोरोना विषाणूच्या संकटाने संपूर्ण जग आणि देश चिंताग्रस्त आहे. या संकटावर मात करण्यासाठी सरकार आणि प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना सर्वांच्या एकीच्या बळाची जोड हवी आहे. त्यामुळे संकटावर मात करण्यासाठी व सर्वांचे मनोबल, धैर्य वाढविण्यासाठी आता सर्व देशवासियांनी एकीचे बळ दाखवले पाहिजे. यासाठी शांती, धैर्य, प्रेम आणि एकमेकांबद्दल जिव्हाळा उत्स्फूर्तपणे प्रकट झाला पाहिजे आणि यासाठी भगवान गौतम बुद्ध यांचे विचार, शिकवण  आणि थोर विचारवंत, पुरोगामीत्व स्वीकारलेल्या या महान व्यक्तीचा “आचार-विचार” अंगिकारावा लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी तथागत गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन” करून व्यक्त केली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.