व्यक्तिगत विचारपूस… आणि भारावलेले नियंत्रण कक्ष

0
6

पालकमंत्र्यांनी जाणून घेतल्या कोरोना लढवय्यांच्या समस्या
चंद्रपूर, दि.7 : शासन-प्रशासन यांच्या समन्वयातूनच सामान्य नागरिकांच्या समस्यांचे समाधान निघत असते. काल पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गेल्या चाळीस-बेचाळीस दिवसांपासून अहोरात्र धडपड करणाऱ्या कोरोना नियंत्रण कक्षाच्या कर्मचाऱ्यांशी व्यक्तिगत पातळी वर चर्चा केली. 14 ते 18 तास सतत काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वार्तालापाने कोरोना विरुद्ध लढण्याचे आणखी बळ मिळाले.

जिल्ह्यामध्ये सामान्य नागरिकांना सध्या अडकून पडलेल्या आपल्या पाल्यांची, नातेवाईकांची व जिवलगाची आस लागली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात विचारपूस करणारे शेकडो फोन रोज धडकत असतात. कोरोना नियंत्रण कक्षात प्रशासनाने 10 वेगळ्या लाईन सुरू केल्या आहेत. वेगवेगळ्या विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांची शिफ्ट ड्युटी लावून येणाऱ्या दूरध्वनीवर योग्य मार्गदर्शन करण्याचे काम या ठिकाणी सुरु आहे. मात्र तरीही आपले घर जवळ करण्यासाठी जिल्ह्यातल्या नागरिकांना शेकडो किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

नकाशांवर राज्याच्या सीमा ठरतात. मात्र व्यावसायिक व पारंपारिक आदान-प्रदान कायम वाहिवाटीने सुरू राहते. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या नागरिकांचा तेलंगाना, आंध्र प्रदेश छत्तीसगड या राज्याची देखील असाच संबंध आहे. जिल्ह्यातील हजारो मजूर तेलंगाना राज्यात कामासाठी जातात. तर छत्तीसगढमधील शेकडो मजूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी कार्यरत आहे. 40 दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये जवळच्या जमापुंजीसह शेकडो मजूर आजूबाजूच्या राज्यात ताटकळत होते. काही चंद्रपूर जिल्ह्यात अडकून होते. या सर्वांना आपापल्या गावांमध्ये जाण्यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार गेल्या 15 दिवसांपासून धडपड करत आहे. शासन-प्रशासन यासोबतच पक्ष आणि व्यक्तिगत पातळीवर देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांना पोहोचविण्यासाठी प्रयत्न चालविले आहे.

यासाठी गडचिरोली व चंद्रपूर या 2 जिल्ह्यात कोरोना संक्रमण काळातही मोठ्या प्रमाणात पालकमंत्री वडेट्टीवार यांना दौरे करत आहेत. जवळपास 20 हजार लोकांना तेलंगाना सीमेवरून आपापल्या गावी खाजगी बसेस पाठवण्याचे काम व्यक्तिगतरित्या त्यांनी केले.

जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या नेतृत्वात आरोग्य तपासणी, माहिती गोळा करणे, गावागावात त्यांची व्यवस्था करणे, प्रवासाची साधने उपलब्ध करून देणे, रुग्णांची तपासणी त्यांच्या अहवालांचे विश्लेषण, खर्चाचा ताळमेळ, अशा अनेक आघाडीवर कोरोना नियंत्रण कक्ष लढत आहे.

व्यस्त कामातून वेळ काढत काल विजय वडेट्टीवार यांनी या कक्षातील प्रत्येक कर्मचाऱ्याशी व्यक्तिगत संवाद साधला. काल याठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी मोहीम मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात आली होती. 40 दिवसांपासून दिवस-रात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाबत काळजी घेत असल्याबद्दलचे समाधान त्यांनी व्यक्त केले. जनसामान्य प्रशासनाने केलेल्या कामाची नक्की दखल घेईल व आठवणी ठेवेल. सध्या प्रशासनाशिवाय सामान्यांच्या मदतीला कोणी धावू शकत नाही. त्यामुळे आपले व्यक्तिगत आयुष्य बाजूला ठेवून लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना मी सलाम करतो…. हे त्यांचे दिलखुलास वाक्य अनेकांना पुढे लढण्याचे बळ देऊन गेले. जवळपास अर्धा तास त्यांनी कोरोना नियंत्रण कक्षात घालवला. पालकमंत्र्यांच्या भेटीचे कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here