फोडणी ते अमेरिका

2
374

शीतल एका खेडेगावात जन्मलेली साधी मुलगी. दिसायला सुंदर, पण शिक्षणात आजिबात रस नसलेली. तिचं एकत्र असं मोठं कुटुंब होतं. घरात पाहुण्यांची लगबग, स्वयंपाकाचा थाट, घरकाम हे बघता बघता तिचं बालपण गेलं. शीतल ला घरकाम, स्वयंपाक, पाहुण्यांचं आगत स्वागत प्रचंड आवडे. आपली आई, आज्जी,काकू कशा प्रकारे अमुक एक कामात तरबेज आहेत, काकू अळूवडी किती छान करते, आई चा भाकरी बनवायचा स्पीड काय जबरदस्त आहे, आजीचं वय झालं तरी लोणचे पापड करायला कशी सरसर पळते…वर्षभराचं धान्य कसं टिकवलं जातं, भरीत करतांना कधी हिरवी मिरची तर कधी लाल मसाला कसा वापरला जातो, भेंडी चिकट होऊ नये म्हणून काय करतात ..

हे सर्व बघण्यात तिचं बालपण गेलं..अभ्यासात रस नसला तरी तिला निरीक्षणशक्ती खूप होती..घरातल्या सगळ्या स्त्रियांची कौशल्य तिने बारकाईने मापली होती..आणि बघता बघता तीही शिकून गेली आणि घरकामात एक अष्टपैलू असं तिचं व्यक्तिमत्व घडलं गेलं…आता काकुसारखी अळूवडी आणि आई सारख्या जलद गतीने भाकरी तीही शिकली होती..लोणची पापड करण्याचे तिचे कौशल्य पाहून आजी “देवा रे, आता मला नेलं तरी हरकत नाही” अशी पुढच्या पिढीला वारसा दिल्याच्या अविर्भावात म्हणत असे…

 तिच्या मैत्रिणी तिला चिडवायच्या…”काकूबाई आहे नुसती, काय बाई ते सारखं घरातलं काम काम..आम्हाला तर जाम कंटाळा येतो असली कामं करायला..”

पण शीतल मात्र रोज नव्या जोमाने कामाला लागायची… 
शीतल च वय झालं तशी तिला स्थळ सांगून आली…शीतल ला आपल्या घरकामाचा आत्मविश्वास असल्याने कुठेही कशाही घरात दिली तरी संसार करण्याची धमक तिला होती, हे ती स्वतः जाणून होती…
एक स्थळ सांगून आलं, मुलगा प्रचंड शिकलेला आणि स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी असलेला…दिसायला उत्तम..प्रचंड पैसा…आणि कर्तृत्ववान असा…साकेत त्याचं नाव..
शीतल ला मुलाचा फोटो पाहूनच तो खूप आवडला…पण तिला वाटलं अश्या मुलाला आणि त्याच्या घरच्यांना शिकलेली मुलगी अपेक्षित असेल, मग मला कसले हो म्हणताय..
पण झालं उलटंच, मुलाने मुलीबद्दल ऐकून आणि तिचा फोटो पाहूनच पसंद केलं..शीतल चा आनंद गगनात मावेनासा झाला…
शीतल आणि साकेत च लग्न झालं.
शीतल मोठ्या शहरात आली. सवयीप्रमाणे तिने आपल्या घराला गोकुळ बनवलं..रोज नवनवीन पदार्थ, घरात काटेकोर स्वछता, वेळच्या वेळी आणि जागच्या जागी अश्या तिच्या वागण्याने घरात कौतुक केलं जाऊ लागलं..साकेत तिच्या गुणांवर प्रेम करत होता, शीतल वर त्याचं जीवापाड प्रेम होतं, आणि लोणच्या प्रमाणे ते दिवसेंदिवस मुरत अजूनच सुंदर होत होतं…
साकेत ची स्वतःची कंपनी होती, 50 हुन अधिक लोकं त्याचा हाताखाली कामाला होती…अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा अश्या मोठ्या देशांची कामं त्याचा कंपनीला मिळत होती…
एकदा अश्याच एका प्रोजेक्ट च्या निमित्ताने त्याला कॅनडा ला जावे लागणार होते आणि तेही एक वर्षभर…साकेत च्या मनात गोंधळ उडाला…कारण इथल्या कंपनीत मोठं मोठे निर्णय घ्यायला त्याला पूर्ण वेळ इथे राहणे गरजेचे होते… दुसऱ्या कुणावर ही जबाबदारी सोपवने जोखमीचं होतं… करोडो रुपयांचा प्रश्न होता…तिथे अगदी विश्वासाचं आणि घरातलं व्यक्ती असणं महत्वाचं होतं… साकेत चे दोन्ही भाऊ अमेरिकेत…त्यांना येणं शक्य नव्हतं…आणि वडील तब्येतीमुळे वेळ देऊ शकणार नव्हते…
खूप विचाराअंती साकेत ने निर्णय घेतला…
शीतल वर कंपनी ची जबाबदारी सोपवायची…
त्याने शीतल ला तसं सांगितलं…
“अहो काहीही काय??? शक्य तरी आहे का?? मी अशी कमी शिकलेली, कॉम्प्युटर कधी चालवलेलाही नाही…तुमच्या कंपनीतील पिउन पेक्षाही माझं हे ज्ञान कमी…तुम्ही डोक्यात तरी कसं आणलं हे???”
“शीतल….हे काम अवघड असलं तरी अशक्य नाही…आणि कंपनीच्या हितासाठी आपल्याला आपल्यातलंच एक माणूस तिथे ठेवावं लागेल….नाहीतर कंपनीतील चलाख लोकं कंपनी आपल्या खिशात घालून मोकळी होतील….कंपनीच्या हितासाठी प्लिज एवढं कर…आणि आपली असिस्टंट काजल आहेच की तुला सोबतीला…सर्वजण तुला मदत करतील…”
मात्र तिला जाम टेंशन आलं,

 “तुम्ही अख्या वरातीचं जेवण बनवायला सांगितलं असतं तर तेही जमलं असतं, पण हे काय वाढून ठेवलंय…”

खूप आढेवेढे घेत शीतल शेवटी तयार झाली…

आता शीतल कंपनीत काय काय करते, तिचं घरकामातलं कौशल्य ती एका मल्टि नॅशनल कंपनीत कसं वापरते ते पाहा पुढील भागात…

भाग 2

साकेत कॅनडा ला जायची तयारी करत होता. शीतल ने त्याची सर्व तयारी करून दिली. जायचा दिवस जवळ येऊ लागला तशी शीतल ची धडधड वाढू लागली. एक तर साकेत इथे नसेल आणि एकटीला कंपनी ची धुरा सांभाळावी लागणार होती.साकेत ने जाण्याचा आधी कंपनीत शीतल बद्दल सर्वांना सांगून ठेवलं होतं. विशेषतः काजल ला, सर्वांना शीतल ला मदत करण्याची आणि समजून घेण्याची विनंती केली. तसं पाहिलं तर स्टाफ एकदम निश्चिन्त झालेला, एक तर बॉस इथे नसेल आणि शीतल सारखी खेडवळ मुलगी आपल्याला काय दबावात ठेवणार आहे…

साकेत कॅनडा ला निघून गेला, जातांना शीतल ला एवढंच म्हणाला, “तुझं कौशल्य आता कंपनीसाठी वापर”…

साकेत ला शीतल वर खूप विश्वास होता, शीतल ला तिच्या गुणांची इतकी ओळख नसेल इतकी साकेत ने तिच्यातली हुशारी हेरली होती. त्यामुळे तो निश्चिन्तपणे शीतल वर कंपनी ची धुरा सोपवत निघून गेला…

साकेत जे म्हटला त्याने शीतल वर प्रभाव पडला…तिच्यातील भय कमी झालं…दुसऱ्या दिवशी ती कंपनीत रुजू झाली…

मस्त चापून चुपून एक कॉटन ची साडी तिने नेसली, गळ्यात साधं मंगळसूत्र, हातात एक बांगडी आणि घड्याळ, कानात मोत्याचे छोटेसे कानातले आणि रेशमी केसांची वेणी असा अगदी साधा पेहराव करून शीतल गेली, या सध्या पेहरावात सुद्धा शीतल खरोखर मालकीण शोभत होती…

सासरे कंपनीत सोडायला आले, कंपनीची माहिती करून दिली आणि साकेत च्या केबिन मध्ये त्याचा खुर्चीवर बसवले… शीतल ला एकदम अवघडल्यासारखे झाले…सासरे बुवा बेस्ट लक म्हणत निघून गेले..शीतल टेबल वरच्या फाईल्स, लॅपटॉप, डायऱ्या बघत होती… त्यांना हात लवायचंही धाडस तिला होईना..

“मे आय कम इन मॅम??”

शीतल मान डोलावतच हो म्हटली…

काजल आत आली..

शीतल ला पाहून काजल ने चक्क तिला मिठी मारली..आणि म्हणाली…

“वहिनी, दादा कौतुक करतात हं तुझं खुप..जसं वर्णन केलं तशीच आहेस तू…”

वहिनी??

“मी काजल, साकेत सरांची असिस्टंट, पण मला असिस्टंट पेक्षा लहान बहिणच समजत असायचे साकेत सर, माझं चुकलं तर समजावून सांगत…मी अगदी मोठ्या भावाप्रमाणे त्यांचा आदर करते…”

ऑफिस मध्ये सुद्धा इतकं निर्मळ नातं जपणाऱ्या साकेत चे शीतल ला कौतुक वाटले…

शीतल ला काजल चा स्वभाव खुप आवडला, तिचं टेन्शन कमी झालं…

“मॅम आता आपण सरांच्या जागी आहात, खूप महत्वाचे निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत…मी आहे तुम्हाला सोबत…काळजी करू नका..”

“थँक्स काजल, खरं म्हणजे मला खुप टेन्शन आलेलं पण तुला पाहून माझी चिंता मिटली…बरं सांग आता, सुरवात कुठून करायची??”

“मॅम, आपल्या कंपनीची उत्पादनक्षमता कमी झाली आहे…म्हणजे प्रत्येकात स्किल आहे पण त्यांना एक मरगळ आलीये तेच तेच करून…ग्राफिक्स डीसायनर तेच तेच चित्र काढून कंटाळले आहेत, सॉफ्टवेर डेव्हलपर ला कोडींग चा कंटाळा आलाय, बिझनेस ऍनालिस्ट requirements गोळा करायला कंटाळा करताय…आम्ही बरेच प्रयत्न केले पण टीम खूपच सुस्तावलेली आहे…”

शीतल ला डेव्हलपर, डीसायनर वगैरे समजलं नाही, पण तिला एवढं समजलं की प्रत्येक जण तेच तेच काम करून कंटाळले आहे, त्यांच्यात नावीन्य आणनं गरजेचं आहे..

एवढ्यात शीतल ला काकूचा फोन आला…विचारपूस करायला काकूने फोन केलेला..शीतल ने एक दीर्घ श्वास घेऊन काकुला विचारले…”काकू, तुला अळू वडी इतकी चांगली काशीकाय जमते गं?”

“हे काय मधेच? आज असं का विचारतेय??”

“सांग ग तू काकू…”

“बरं ऐक, मी पहिल्यांदा जेव्हा अळूची वडी केलेली ना तेव्हा अगदी बेचव झालेली…पण तुझ्या आजीने त्याचं कौतुक करून मला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं, मलाही वाटू लागलं की मी खरंच खूप छान वडी बनवू शकते, माझं मन हेच स्वतःवर बिंबवू लागलं… मग पुढच्या खेपेला मन लावून बनवू लागले, त्यात बदल करत गेले, चार जास्तीच्या गोष्टी टाकून पाहू लागले…आणि असं करत करत मला उत्तम यायला लागली, त्या दिवशी आजीने जर नाव ठेवलं असतं तर आजवर मी अळूवडी करू शकले नसते…”

शीतल ला उत्तर मिळालं…काजल कडून तिने प्रत्येकाने केलेल्या कामाची लिस्ट मागवून घेतली… तिने टीम मधल्या प्रत्येकाला केबिन मध्ये बोलावलं…आणि त्यांचा कामाची प्रशंसा केली…त्यांना प्रोत्साहन दिलं…

खर तर याच गोष्टीची कमी होती…सर्वजण खूप छान काम करत होते पण आपल्या कामाची कदर, कौतुक ऐकायला सर्वजण आसुसले होते..शीतल ने कामाचं कौतुक केलं तसं टीम ला हुरूप आला, एका नव्या जोशाने ते काम करू लागले…
एक महिना लोटला, काजल ने महिन्याचे रिपोर्ट्स पाहिले तेव्हा तिला समजलं कि शीतल च्या या गोष्टींमुळे उत्पादन क्षमता वाढली होती…शीतल ने पहिल्याच बॉल ला सिक्सर मारला होता…
आता पुढचं आव्हान होतं ते कंपनीची रँकिंग वर आणायचं…त्यासाठी टीम ला अधिकाधिक कार्यक्षम करणं जरुरीचं होतं..
एकदा ऑफिस सुटल्यावरही लोकांना काम करतांना बघून शीतल ने काजल ला विचारलं , काजल म्हणाली
“बऱ्याचदा डेडलाईन पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ थांबावं लागत, कधी तर रात्री 10-11 पर्यंत थांबावं लागतं…”
दुसऱ्या दिवशी शीतल ने जाहीर केलं की 6 ची वेळ झाली की सर्व काम थांबवून घरी जायचं..कारण साकेत च वर्क लाईफ बॅलन्स बघून शीतल लाही वाटायचं की साकेत ला घरात वेळ देता येत नाही..टीम ला कंपणीसोबतच आपल्या घरालाही प्राथमिकता द्यायचं तिने सांगितलं…वर्कर्स ला तिने वर्क लाईफ बॅलन्स करण्यासाठी सूट दिली…पण डेडलाईन च काय?? काम पूर्ण करणं जरुरीचं होतं…
शीतल ने सर्वांच्या कामाचा आढावा घ्यायचं ठरवलं…तिला संगणक चालवता येत नव्हता…तिने प्रत्येकाला आपल्या कामाची नोंद एका डायरीत करण्यास सांगितली… महिना उलटला तश्या तिने डायऱ्या जमा केल्या आणि त्यांचा अभ्यास केला, सोबतच ऑफिस मधल्या cctv चे फुटेज मागवले…तिच्या 2 गोष्टी लक्षात आल्या..
पुरेशा नियोजन अभावी कामात ताळतंत्र नव्हते…इडल्या करायच्या म्हणजे 2 दिवस आधी तांदूळ भिजवावे लागतात, ऐन वेळी करायचं झालं म्हणजे दुसऱ्या वाटेने ते करावी लागतात… स्वयंपाकाला पाहुणे येणार असतील तर आधल्या दिवशी किचन मधलं समान तपासावे लागते, भाजीपाला आणून ठेवावा लागतो…हे तिला माहीत होतं…
तिने टीम ला आपल्या पुढील 7 दिवसाच्या कामाची लिस्ट बनवून ठेवायला लावली आणि त्यानुसार काम करायला लावले..
वर्कर्स ला पुढील 7 दिवसाचं टार्गेट समजल्यामुळे टाइम मॅनेजमेंट करणं त्यांना सोपं गेलं…आणि डेडलाईन च्या आधी काम पूर्ण होत गेलं..
वर्कर आपल्यासोबत डायरी बाळगत त्यामुळे आपल्या कामाचा वेळोवेळी आढावा घ्यायला त्यांना दरवेळी लॅपटॉप उघडायची गरज पडत नसे.….
काजल शीतल चं हे काम पाहून म्हणाली,
“मॅम, मोठ्या कंपनीत 20 वर्षाचा अनुभव असलेल्या व्यक्तीलाही हे जमलं नसतं, तुम्हाला कसकाय जमलं हे?”
“अगं वेडे, मीही 20 वर्ष अनुभव घेतलाच की, घर नावाच्या कंपनीत…”
3 महिने उलटले… टीम च्या चांगल्या कामामुळे अमेरिका चा एक प्रोजेक्ट हातात आला, काजल ला तसा मेल आला आणि ती धावत शीतल कडे आली…
“अरेवा, खुप छान,आता कामाला लागुया…”
“नाही मॅम, हा प्रोजेक्ट आपल्याला करता येणार नाही, कारण हा खुप मोठा प्रोजेक्ट आहे आणि हे काम फक्त स्नेहा ला जमतं…”
“मग तिलाच देऊ ना हे काम…”

“मॅम, ती बाळंतपणाच्या रजेवर आहे…2 महिन्याचं बाळ आहे तिचं…”
शीतल ने काजल ला सोबत घेतलं, तडक आपली गाडी काढायला सांगितली आणि स्नेहा च्या घरी दोघी गेल्या..
जातांना बाळासाठी कपडे, सोन्याचे कडे आणि पाकिटात पैसे शीतल घेऊन गेली…
स्नेहा च्या घरी जाताच काजल ने शीतल बद्दल सांगितलं…एवढी मोठी मालकीण आपल्या बाळासाठी एवढं घेऊन आली म्हणून स्नेहा ला कौतुक वाटलं…
बोलण्यातून लक्षात आलं की स्नेहा ला काम करायची खूप इच्छा आहे, पण बाळाला सोडून जायची हिम्मत तिच्यात नव्हती…कामावर जरी आले तरी सगळा जीव बाळात अडकून राहील असं ती म्हटली…
शीतल ने यावर तोडगा काढला…बाळालाही सोडयचं नाही आणि पूर्ण वेळ कामही करायचं…काय होता तो तोडगा??
वाचा पुढील भागात….

भाग 3

 2
शीतल ला समजलं की स्नेहा ला काम करायची खूप इच्छा आहे. पण यावर तोडगा काय काढावा??

साकेत ने शीतल ला निर्णय घेण्याची पूर्ण सूट दिली होती, आणि कंपनीच्या अकाऊंट मधले बरेच पैसे वापरायची परवानगी दिली होती…

शीतल घरी गेली, tv वर भजन चालू होते, तिला आठवलं, आपल्या गावी कशी मंदिरात भजनं, कीर्तने व्हायची, आजी काकू आई आणि मी न चुकता जात असायचो, तिच्या डोळ्यासमोर आजीचे कीर्तनात दंग झालेले डोळे आठवायचे, आजीला नीट बसता येत नसे, आजी गर्दीच्या बाजूला पाय मोकळे करून बसायची, डोळे किर्तनाकडे पण हात मात्र लसूण सोलत, कुठेही गेलं की आजी हातात लसूण किंवा भाजी निवडायला न्यायची, तेवढाच सैपकाचा टाइम वाचतो असं आजी म्हणायची…

स्त्री एका वेळी अनेक काम उत्तमरीत्या करू शकते हे तिला उमगलं।  

तिला आठवलं सगळं, 2 मिनिटं ती स्तब्ध झाली, चेहऱ्यावर एकदम हसू उमटले…

तिला काहीतरी सुचले होते…

दुसऱ्या दिवशी तिने काजल च्या मदतीने कंपनीच्या वरच्या मजल्यावर काही रुम बनवायला सांगितल्या… आणि सर्वांना बोलवून तिने कंपनीचा नवीन निर्णय जाहीर केला…

“स्त्रियांना घर आणि बाळंतपण, दोघेही चुकत नाही…पण यामुळे त्यांच्या करियर ची गाडी अडते, इच्छा असूनही त्यांना ते करता येत नाही, पण आपली कंपनी अश्या स्त्रियांचा आदर करून त्यांना आधार देणार आहे.

कंपनीच्या वर ज्या खोल्या बांधल्या जाणार आहेत त्या खास आशा मातांसाठी असतील ज्यांना बाळ झाल्यावरही काम सुरू ठेवायचे आहे…तिथे बाळंतीण बाई साठी लागणाऱ्या सर्व सुविधा असतील, बाळाला पाळणा, झोळी, खेळण्या, एक मोठा पलंग, आईला काम करण्यासाठी लॅपटॉप, टेबल आणि सर्व सुविधा आणि बाळाकडे लक्ष देण्यासाठी ऑफिस च्या पूर्ण वेळात काही आया तेथे असतील, त्यांना घरून एखादी व्यक्ती आणायची असेल तर त्यालाही परवानगी असेल…

ह्या खोल्या वरच्या मजल्यावर असल्याने बाळाच्या आवाजाचा कोणालाही त्रास होणार नाही, आईला पूर्वी सारखे काम शक्य नसले तरी जेवढे होऊ शकेल तितके करावे आणि जितके काम तितका पगार अशी अट असेंल, शेवटी बिझनेस करायचा म्हणजे अवाजवी सूट देणे योग्य नाही…”

तिच्या या निर्णयाचे प्रचंड कौतुक झाले, स्नेहा परत कंपनीत जॉईन झाली, तिने आपल्या आई ला सोबत आणायचे ठरवले…

स्नेहा च्या खोली प्रशस्त होती…बाळ जास्त वेळ झोपलेलाच असे, त्या वेळात स्नेहा काम करी… तिची आईही तेव्हा आराम करून घेई…बाळ उठले की स्नेहा त्याला पाजून आईकडे देई आणि बाळ खेळण्यांमध्ये दंग होऊन जाई, मग स्नेहा परत आपल्या कामात लक्ष देई, मधेच बाळाकडे पाही, बाळाला डोळ्यासमोर पाहून तिचा ऊर आनंदाने भरून येई, मनातून शीतल ला लाख लाख आशीर्वाद देई…

स्नेहा ने वेळेच्या आधी प्रोजेक्ट पूर्ण केला, आणि पगार तर नेहमीपेक्षा जास्तच झाला, कारण खोलीतल्या वातावरणामुळे बाळाला काहीही त्रास झाला नाही आणि ते खूप रमले…

ऑफिस मधल्या सर्वांना त्याचा लळा लागला, ब्रेक मध्ये बाळाला कोण घेतो यावर सर्वांच्या भानगडी होत, ऑफिस सुटल्यावर बाळाला खेळवण्यासाठी सर्व आतुर होत…बाळाचं नाव शीतल ने ‘शौर्य’ असं ठेवलं…कॉर्पोरेट जगत आणि भावभावनांचे जग याचा सुरेख संगम शीतल ने ऑफिस मध्ये घडवून आणला होता..

शीतल ने cctv कॅमेऱ्यातून एक गोष्ट शोधून काढली..तिने काजल ला बोलावलं…

“काजल, भेंडीची भाजी चिकट होऊ लागली तर काय करतात माहितीये??”

“मॅम, म्हणजे?? काय करतात??”

“त्यात लिंबू पिळतात”

शीतल काजल ला घेऊन जिथे सर्व कर्मचारी काम करतात तिथे आली, 

तिने जाहीर केलं की आता सर्वांच्या बसायच्या जागा बदलायच्या आहेत…तिने प्रत्येक 2 नवीन व्यक्तींमध्ये 1 सिनियर व्यक्ती बसवली…

ते काम झालं आणि काजल आणि शीतल केबिन मध्ये आले, काजल ने विचारलं की असं का केलं??

“ऐक काजल, ऑफिस मध्ये 2 नवीन व्यक्ती शेजारी बसतात, समान वयाच्या…मग काम करतांना कधी त्यांचा गप्पा रंगतात, पेन ड्राइव्ह, मुव्ही ची देवाण घेवाण होते…यात त्यांचा वेळ जातो आणि उत्पादन क्षमतेवर फरक पडतो..ह्याच त्या भेंडीच्या चकत्या ज्या एकमेकाला चिटकून बसतात…सिनियर व्यक्ती मात्र वर्षानुवर्षे कामात मुरलेली असल्याने कामाचे गांभीर्य त्यांना समजते आणि ते गप्पांमध्ये वेळ घालवत नाहीत…मग या अनुभवाचा लिंबासारखा रस जेव्हा चिकटणाऱ्या भेंडीत पडतो तेव्हा तो त्यांना चिटकण्यापासून रोखतो…

काजल कितीतरी वेळ शीतल कडे बघतच राहिली..

पुढचा महिना लागला, काजल ने रिपोर्ट्स पाहिले…शीतल च्या भेंडीच्या प्रयोगाने उत्पादनक्षमता अजून वाढली…

कलाइन्ट सोबत काजलच बोलायची, कारण शीतल ला इंग्रजी फारसं येत नव्हतं… पण काजल जेव्हा जेव्हा इंग्रजी बोलायची तेव्हा का कुणास ठाऊक पण शीतल गालातल्या गालात हसायची…

शीतल काजल ला आपल्या गावाकडच्या गोष्टी सांगे…काजल शहरात वाढली असल्याने तिलाही गंमत वाटायची…शीतल ने सांगितले की त्यांचा घरी कधीही केव्हाही पाहुणे येऊन बसायचे, अगदी जेवायच्या वेळी सुद्धा…पण आई आजी आणि काकू 15 मिनिटात त्यांचा स्वयंपाक करून जेऊ घालायच्या…

एकदा तर अचानक 15 लोकं भेटायला आली, सर्वांची जेवणं एव्हाना होऊन गेलेली…आता या लोकांचा स्वयंपाक पुन्हा करावा लागणार होता..

“बापरे, मग त्यांना हॉटेल मधून मागवलं असणार…” काजल म्हणाली..

“नाही ग वेडे, खेड्यात कसलं हॉटेल न कसलं काय… अशी emergency आली ना की मग आमच्या शेजार पाजार च्या बायांना बोलवत असू, त्या हक्काने यायच्या आणि स्वयंपाक अगदी पटदिशी तयार व्हायचा…

एकदा एक मोठा प्रश्न कंपनीसमोर उभा राहिला..अँड्रॉइड ऍप बनवायचे 2 प्रोजेक्ट हाती आले, एक अमेरिकेचा आणि एक ऑस्ट्रेलिया चा…दोघांनाही काम अर्जंट हवे होते.. पण ऍप वर काम करणारी टीम एका वेळी एकच काम घेऊ शकत होती, त्यामुळे कुठलातरी एकच प्रोजेक्ट स्वीकारावा असं सर्वांचं मत पडलं…

पण शीतल ला दोन्ही संधी सोडायच्या नव्हत्या…

काजल एव्हाना शीतल कडून शिकली होती…तिच्या डोक्यात प्रकाश पडला…धावतच ती शीतल कडे गेली..

“मॅम, आपल्यालाही शेजारच्या लोकांना बोलवावं लागेल…!!!”

शीतल हसली, दोघीही कामाला लागल्या..

काजल ने शहरातल्या जवळच्या आणि छोट्या एका कंपनीला काही महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट वर काम दिलं, त्यांना तिथे येऊन शीतल च्या डेव्हलपर्स सोबत काम करायचं होतं…जेणेकरून quality वर स्टाफ च लक्ष असेल…दोन्ही प्रोजेक्ट्स शीतल ने टीम कडून पूर्ण करून घेतले..कलाइन्ट ला कामं खूप आवडली, कंपनीला भरघोस फायदा झाला…

शीतल च्या कंपनीची रँकिंग वाढली, दर वर्षी अमेरिकेत एक बिझनेस कॉन्फरन्स असायची, यावेळी शीतल ला आमंत्रित केले गेले, एव्हाना राज्यात ती पहिलीच अशी बिझनेस वूमन असेल. घरी आणि कंपनीत आनंदी आनंद झाला, कारण या कॉन्फरन्स च्या आमंत्रणासाठी कितीतरी कंपन्या प्रयत्न करतात पण शीतल ला लगेच ती संधी मिळाली होती..

शीतल ला विश्वास बसेना, तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले…

साकेत ला कळवलं गेलं, साकेत म्हणाला…

“शीतल, तू आज असं कर्तृत्व केलं आहेस जे माझ्यासारख्या इतक्या शिकलेल्या मुलालाही जमलं नाही…आता अमेरिकेत जा आणि गाजवून ये तिथेही…प्राउड ऑफ यू”

शीतल चे मन उचंबळून आले..

पण शीतल अस्वस्थ झाली, इतका मोठा प्रवास…कधीच केला नव्हता…

या विचारात असतांनाच काजल ने शीतल च्या पाठीवर हात ठेवला…शीतल ने काजल कडे पाहिलं…काजल हसली…शीतल निर्धास्त झाली..

दोघीही अमेरिकेला जायला निघाल्या… तिकडे गावाकडे तर शीतल च्या घरच्यांनी अख्या गावभर पेढे वाटले….

अमेरिकेत त्या दोघी पोचल्या…

हॉटेल रूम मध्ये असताना काजल ने शीतल ला सूट घालण्यास सांगितला… शीतल म्हणाली..

“आपण आपली परंपरा, संस्कृती आणि विचारांमुळे इथवर पोचलो आहोत…मग आता मोक्याच्या क्षणी वेष बदलून कसं चालेल? आपण पुढे जायचं…पण आपली परंपरा सोबत घेऊनच…”

दोघींनीही छान अश्या साड्या नेसल्या, शीतल ने काजल साठी साडी, ब्लॉऊस सगळं तयार ठेवलं होतं… शेवटी दूरदर्शी पणा कशाला म्हणतात….

कॉन्फरन्स सुरू झाली…वेगवेगळे अवॉर्डस ठेवले होते…

“….And best startup and rising talent award goes to….Mrs. shital….”

काजल मोबाईल मध्ये बोटं घालत होती तो हे ऐकताच हातातून सुटला…शीतल काजल कडे बघत होती…हे माझं नाव का घेतलंय?? काजल ने पटकन तिला उठून स्टेज वर जाण्यास सांगितले…शीतल ने स्टेज वर जाऊन अवॉर्ड घेतला, अँकर ने शीतल ला 2 शब्द बोलायला लावले…

काजल ला धस्स झाले, शीतल कशी बोलणार?? तिला तोडकं मोडकं इंग्रजी यायचं…शीतल घाबरून जाईल, काय करावं, काजल अँकर ला विनंती करायला उठून जाणार इतक्यात कानावर शब्द पडले…

“Thanks to all achievers present here, I intentionally said ‘achievers’..because each one of you deserves the invitation of this conference…I am accepting this award on behalf of each Indian lady, who is blessed with the skill of multitasking, management and leadership. An Indian lady learns team management concept while serving her joint family… She learns multitasking while cooking food on different demands..she learns leadership while carrying out family functions…I am dedicating this award to all women in my country. Thank you once again…”
काजल मोठा ऑ करून जी बसली होती ती शीतल परत जागेवर येऊन बसेपर्यंत तशीच…शीतल कडे मोठ्या आश्चर्याने बघत होती…

कॉन्फरन्स संपली, सर्वजण हॉटेल रुम्स मध्ये गेले..

“मॅम तूम्ही कसं बोललात इतकं अस्खलित?? तुम्हाला इंग्रजी येत नव्हतं ना??????”

शीतल म्हणाली,

“मी ऑफिस मध्ये केबिन मध्ये बसून काय करायची असं तुला वाटतं?? अर्धी कामं तर तूच सांभाळायची आणि मग उरलेल्या वेळात मी आपलं इंग्रजी पक्क करायच्या मागे लागले…तुला सांगितलं नव्हतं, कारण मला तुला सरप्राईज द्यायचं होतं…”.

खूप वर्ष लोटली…साकेत कधीच परत आलेला…दोघांनीही कंपनी खूप वर नेली…त्यांना एक मुलगी झाली…तिचं लग्नही झालं… दोघे वार्धयक्याकडे झुकले होते…एका वर्षी सर्वोत्कृष्ट व्यावसायिक म्हणून एका मुलाला शीतल च्या हस्ते अवॉर्ड दिला जाणार होता…. कार्यक्रम ठरला, त्या मुलाला अवॉर्ड दिला गेला, शीतल ने त्याला शुभेच्छा दिल्या…त्या मुलाला स्टेज वर बोलायला सांगितले तेव्हा तो म्हणाला…

“आज मी जो काही आहे ते शीतल मॅम मुळे… माझ्या जन्माच्या सुरवातीच्या अगदी काही महिन्यांपासून बिझनेस चे बाळकडू मला मिळाले…माझ्या आईला आणि मला ज्या पद्धतीने शीतल मॅम ने आधार दिला, त्याचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही…”

शीतल ला प्रश्न पडला, मी याला ओळ्खतही नाही…कोण हा?? त्यांनी मागच्या पोस्टर कडे एकदा वळून पाहिले, तिथे त्या मुलाचं नाव होतं…”शौर्य”

कोण होता तो सांगा बरं आता तुम्हीच कंमेंट मध्ये…कथा कशी वाटली तेही सांगा….मी वाट बघत आहे 😊😊😊😊 

©संजना इंगळे

इथे हि वाचा

1 खरंच मनापासून प्रेम करत असाल तर हि स्टोरी एकदा वाचाच

2 स्वतःची वेबसाइट बनवा आणि पैसे कमवा

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here