“अण्णा नक्की कोणाच्या बाजूने?, हे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या”

Spread the love

मुंबई | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 30 जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतलं. यावरून  शिवसेनेनं सामनाच्या आग्रलेखातून अण्णा हजारे यांना काही सवाल केले आहेत.

अण्णांनी आधी उपोषण जाहीर केलं आणि आता केंद्र सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून ते स्थगित केलं. हे सगळं ठीक आहे, पण शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करणाऱ्या कृषी कायद्यांबाबत त्यांची भूमिका काय आहे? या कायद्यांविरोधात सिंघू बॉर्डरवर मरमिटण्यास तयार असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अण्णांचा पाठिंबा आहे का? अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या सर्व प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या, असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अण्णा दोन वेळा दिल्लीत आले आणि त्यांनी जंगी आंदोलन केलं. या आंदोलनाच्या मशालींवर तेल ओतण्याचं काम तेव्हा भाजपने केलं, पण गेल्या सात वर्षांत मोदी राज्यात नोटाबंदीपासून लॉक डाऊनपर्यंत अनेक निर्णयांमुळे जनता बेजार झाली, पण अण्णांनी कूसही बदलली नाही असा आरोप होत राहिला. म्हणजे आंदोलने फक्त काँग्रेस राजवटीतच करायची काय? बाकी आता रामराज्य अवतरलं आहे काय?, असा सवाल शिवसेनेनं विचारलाय.

राजकीय पक्षांनी त्यांना वेळोवेळी वापरून घेतले. त्यात अण्णांच्या शरीराची प्रचंड झीज झाली. उपोषण करणे व ती पुढे रेटणे ही साधी गोष्ट नाही. पुन्हा अण्णांचे वय पाहता त्यांनी जिवाचा धोका पत्करू नये, असं शिवसेनेनं म्हटलंय.


Spread the love