आपली धंद्याची रोगट मानसिकता मोडेन पण वाकणार नाही .. नाद नाही करायचा

0
8

आपली धंद्याची रोगट मानसिकता
================
मोडेन पण वाकणार नाही .. नाद नाही करायचा ..

माझ्या मित्राच्या लेखनीतून आलेला एक विचार करण्यायोग्य सत्य परिस्थिती.

आपण सर्व मराठी “मोडेन पण वाकणार नाही ” या वाकप्रचाराचा खूप अभिमान बाळगतो पण हा वाकप्रचार कुठे आणि कधी बाळगावा हे आपल्याला कळले पाहिजे .. श्री शिवरायांचा हा बाणा त्यांना त्यांच्या अधिकारांमध्ये व ज्या परिस्थितीमध्ये ते राज्य उभे करत होते तिथे तो शोभून दिसत होता आणि महाराज हि हा गुण प्रत्येक ठिकाणी वापरत न्हवते .. वेळ प्रसंगी ते तहाची किंवा एक पाऊल मागे घेण्याची भूमिका पण घायचे .. हि बॅकग्राऊंड द्यायचे कारण म्हणजे मला काल व बहुतांश वेळेला येतोच (काही अपवाद .. त्या बद्दल हि उल्लेख केला आहे ).

तर काल मी बाणेर क्रोमा स्टोअर मध्ये कॅमेरा ट्रायपॉड व हेड फोन घ्यायला गेलो होतो .. दोन्ही वस्तू घेऊन बिलिंग कॉउंटर वर गेलो .. बिल झाल्यावर मी गुगल पे चा बारकोड मागितला .. कौंटर वरच्या मुलाने गुगल पे बंद आहे , पेमेंट कार्ड ने करावे लागेल असे सांगितले (खरे तर उर्मट भाषे मध्ये पण असो ) .. मी विचारले दुसरा काही वे आऊट नाही का ? त्याने माझ्याकडे न बघता नाही म्हणून सांगितले .. तरीही सभ्यता दाखवत मी त्याला म्हंटले मग आता हे खरेदी नाही करता येणार .. मी जाऊ का ? पुन्हा उर्मट भाषेत “हो ” .. असेही कि नाही कि हा मुलगा खूप बिझी होता .. कौंटर वर मी फक्त एकटा होतो .. आणि खरेदी रक्कम पण अगदीच इतकीही लहान न्हवती कि गेला तर गेला कस्टमर काय फरक पडतो असे म्हणता येईल. दोन्ही वस्तू मिळून अंदाजे रु.४००० बिल होते .. मग मात्र मला वाईट वाटले व थोडा राग हि आला .. स्वतःला आपली मराठी पोरे मावळे म्हणवतात पण हा विचार करत नाहीत नोकरीच्या ठिकाणी कि मी काय अजून केले म्हणजे मालकाचा किंवा कंपनीचा थोडा आणखी फायदा होईल .. मग मी त्याच्या मॅनेजर ला बोलावले व विचारले कि लॉक डाउन मध्ये एखादा कस्टमर ऑर्डर कॅन्सल करून जात असेल तर त्याला जाऊ दे व कुठलेही सोल्युशन काढायचे नाही असे काही ट्रेनिंग दिले आहे का ?

सगळी परिस्थिती समजल्यावर त्याने त्या कौंटरवरच्या मुलाला समजावयाचा प्रयत्न केला पण या महाभागाने “मी कॅशिअर आहे , मला काय पडलंय कस्टमर ला वस्तू घायची आहे का नाही ते ” … हि कालच घडलेली घटना आहे .. मग मॅनेजर ने आणि मी मिळून तोडगाही काढला व मला वस्तू खरेदी करता आल्या .. पण या कॅशिअर महाशयांना हे कळत न्हवते कि त्याचा पगार स्टोअरचा बिझनेस झाला तरच होणार आहे .. पण बहुतांश मराठी मुलांची हि मानसिकताच नाहीये ..

हा विषय निघाला म्हणून आठवले , शिरूर मध्ये जिथे मी लहानाचा मोठा झालो.. तिथे तर्डोबाच्या वाडीला जो रस्ता जातो तिथे एक पेपर कंपनी होती … भूमिपुत्रांना नोकरी मिळालीच पाहिजे हि आपल्या मराठी लोकांची खास व हक्काची मागणी असते .. असायलाच पाहिजे पण नोकरी मिळाल्यावर मी मला पाहिजे तसेच काम करणार हि कसली वृत्ती ? आणि सारखेच काम न करण्याकडे कल .. तिथला एक अनुभव जो माझ्या डोळ्या देखत एकदा नाही अनेकदा आला कि जो मला आजही अस्वस्थ करतो .. मालकाने जवळपास ३० ते ३५ मुलांना रोजगार दिला होता .. काम हि जास्त श्रमाचे न्हवते .. हा पेपर वेस्ट कापडांच्या तुकड्यांचा लगदा बनवून प्रेस करून बनवला जायचा व त्याची एक प्रोसेस होती .. हे कापडाचे तुकडे वेगवेगळ्या टॅंक व बोगद्यामधून प्रोसेस होत होत प्रेस मशीन पर्यंत जायचे व प्रेस मशीन मधून तो लगदा प्रेस होत होत त्याचा कागदाचा रोल बनायचा .. आणि या प्रोसेस मध्ये वाळूचा छोटा कण जरी आला तरी अख्खा रोल वाया जायची शक्यता असायची कारण तो खडा जर प्रेस मशीन मध्ये अडकला तर तो अख्या रोल ला ओरखडा उमटवत राहायचा .. हि मुले खिशात छोटे दगड घेऊन जायची व प्रेस मशीनमध्ये ठेवायची व शेवटी क्वालिटी मध्ये रोल रिजेक्ट झाला कि जेवणाच्या सुट्टी मध्ये हसून हसून एक मेकांना टाळ्या द्यायची .. काय हि मनो वृत्ती ?

टाटा मध्ये युनिअन होती .. तिथे सुद्धा एकच प्रकार .. काम नाही करायचे .. एकदा अहमदनगरला मी क्रॉम्प्टन मध्ये माझ्या कामासाठी गेलो होतो , तेंव्हा तर अंगावर शहारे आणणारा प्रकार बघितला .. मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मध्ये नाश्ता , जेवण , चहा वैगरे गोष्टी फुकट किंवा नाम मात्र पैशामध्ये दिल्या जातात .. मला वाटते उप वा साचा दिवस असावा म्हणून खिचडी होती व मी आणि अजून एक क्रॉम्प्टन मधले ऑफिसर दोघेही नाश्ता करत होतो .. खिचडीही निश्चित चांगली होती पण एक कामगारांचा ग्रुप तिथे कँटीन मालकाशी कशावरून तरी भांडायला लागला .. व त्यांचा मराठी राग इतका उच्च पातळीवर गेला कि कमीत कमी ३०० लोकांसाठी असलेली खिचडी त्या महाभागांनी जमिनीवर ओतून दिली .. अरे काय हे ?

म्हणून पर प्रांतियांनी इथे बाजी मारली .. तीनही उदाहरणे जिथे गरजू किंवा ज्याला अनुभव घेऊन पुढे जायचे आहे , तिथे कधीच दिसणार नाही .. म्हणून आज लाखोंचे लोंढे जेंव्हा परत जाताना दिसत आहेत तेंव्हा लक्षात येते कि केवढ्या संधी उपलब्ध होत्या मराठी मुलांना पण फक्त आणि फक्त कामाविषयी नसलेली श्रद्धा व मोडेन पण वाकणार नाही सारख्या तयार झालेल्या मनोवृत्ती या मुळे आपली मुले फक्त राजकीय मिरवणुका , गणपती , दहीहंडी अश्या साठी शिल्लक राहिली आहेत ..

अर्थात याला अपवाद हि आहेत . गेल्या आठवड्यात माझ्याकडे AC दुरुस्त करायला अर्बन क्लिप मधून मारुती वडार नावाचा मुलगा आला .. वय वर्षे २० वैगरे असेल. सांगलीचा होता .. व्ययस्थित बोलणे , व्यवस्थित काम पूर्ण व बोलण्यात प्रचंड गोडवा .. थोडे काम जास्त असल्याने बिल ३००० वैगरे आले .. मी त्याला स्वतःहून ५०० रुपये जास्त दिले व सहज म्हणून याच विषयावर संवाद साधला .. इतके कौतुक वाटते कि दहावी नंतर त्याने स्वबळावर AC दुरुस्ती शिकला . व व्यवसाय करू लागला .. रोजचे नुसते सर्व्हिसिंग कॉल्स ३ ते ४ .. आणि ए व्हरेज ६० ते ७०००० हजार कमावतो .. थंडीच्या सिझन मध्ये तो त्याचा फोकस इतर उपकरणांकडे वळवतो .. त्याला विचारले तू आणखी चार मराठी मुलांना का बरोबर आणत नाहीस .. तर पटकन म्हणाला .. नको सर त्या पेक्षा ओरिसाची मुले चांगली असतात .. यातच सर्व काही आले ..

मोडेन पण वाकणार नाही हे ठीक आहे पण मोडलास तर पुढे काय हे सांगायला कुठलाही पुढारी येणार नाहीये .. आता पुन्हा संधी आहे .. बघूया काही फरक पडतो का ..
नाही तर आहेच .. येरे माझ्या मागल्या .. “नाद नाही करायचा ..”

हो रे बाबा .. तुझ्याशी कोण नाद करणार ..पण जरा बाजूला हो त्या भैय्याला काम करू दे ..

मानसिकता बदला महाराष्ट्र बदलेल.
● कॅप्टन अरूण कदम.

इथे हि वाचा

महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना सवर्ण मुलीवर प्रेम करतो म्हणून बौध्द मुलाची हत्या

लोकप्रिय तुकाराम मुंढेंविरोधात नागपूरच्या या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

कोकणवासीयांना मदतीला भाजपा 14 ट्रक मदत सामुग्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here