ठाणे-बेलापूर वाशी डाउन रेल्वे मार्गावरील फेऱ्या वाढविण्याची वंचितची मागणी

कल्याण,दि.२२ – देशाअंतर्गत सध्या अनलॉकची प्रक्रिया चालू आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा दिलेली आहे. परंतु कल्याण वरून व्हाया ठाणे बेलापूर वाशी या ठिकाणी काम करण्यास जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. संध्याकाळच्या वेळेस डाऊन मार्गावरच्या लोकल फेऱ्या कमी प्रमाणात असून एकच फेरी असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका वंचित बहुजन आघाडीचे महासचिव विजय कांबळे यांचे नेतृत्वाखाली कल्याण शहर अध्यक्ष ॲड. प्रवीण बोदडे , वंचितचे जिल्हा संघटक विनोद रोकडे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश पंडित, जितेंद्र भुकाने, नागसेन भोसले, सचिन नागरे यांच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वे स्टेशन प्रबंधकांना आज निवेदन दिले. डाऊन मार्गावरील रेल्वे फेऱ्या वाढविण्याबाबत त्याचा पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी करण्याची विनंती करण्यात आली.

सायंकाळच्या वेळेस बेलापूर वाशी ठाणे या ठिकाणी अनेक खाजगी कंपन्या तसेच सरकारी कार्यालय असून त्यांच्या कर्मचाऱ्यांची सुटण्याची वेळ एकच असल्याने सायंकाळच्या वेळेस या सर्व रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होते. त्यामुळे ठाण्याला येण्यासाठी सायंकाळच्या वेळेस एकच रेल्वे फेरी असल्याने प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत आहे. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाइलाजास्तव बस, एसटी, खाजगी वाहनाने कल्याण शिळफाटा मार्गे प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा दोन्ही वाया जात आहे. हे लक्षात घेता रेल्वेने सायंकाळच्या वेळेस डाउन मार्गावर जास्तीत जास्त रेल्वे फेऱ्या सुरू कराव्यात, अशी विनंती वंचित तर्फे करण्यात आली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: